छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अभिवचन रजेवर मुक्त झालेला एक कैदी रजेची मुदत संपूनही परत आलाच नाही. त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कारागृहातील कर्मचारी शिवाजी निवृत्ती मुंढे (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले. विलास ऊर्फ गुलाब गायकवाड (रा. तीसगाव) असे कैद्याचे नाव आहे.
विलास गायकवाड याला १९ जानेवारी रोजी अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. हमीपत्रानुसार त्याने ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ पर्यंत कारागृहात हजर राहणे बंधनकारक होते. मात्र, ठरलेल्या वेळेत तो परत आला नाही. २० फेब्रुवारीपर्यंत तो कारागृहात न परतल्याने प्रशासन सतर्क झाले. वरिष्ठांच्या आदेशानुसार, विहीत मुदतीत परत न आल्यास संबंधित बंदीविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश असल्याने ही कारवाई करण्यात आली. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अरुण उगले करीत आहेत. रजेचा कालावधी संपल्यानंतर आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.












